Sunday, February 14, 2016

माझी गुणी

गोष्ट सुरु होते मला वालचंद ला admission मिळाली तिथून.  government कॉलेजला admission , सांगलीतल्या सांगलीत college एवढे मुद्दे बास होते आमच सगळ घरदार खुश व्हायला :)  !!! कॉलेज सुरु झाल आणि आठवडाभरात आईने विचारलं,"अप्पु काय बक्षीस हवय ग तुला ?" मी लगेच म्हणाले "कुत्र घेऊ दे ना मला एक !!!!"
आता पुढच जे संभाषण होत ते आमच्या घरी अनादिकाळापासून चालत आलेलं ! अर्थातच, आईन लगेच नाही मान्य केल : आपल्याला कुत्र्याची गरज नाही ( गरज कशी नाही !! आपण बंगल्यात राहतो, मी कधी कधी घरी एकटी असते  आणि मुळात गरज नाही फक्त माझी आवड म्हणून नाही का आणू शकत आपण !!), ती एक जबाबदारी आहे (मी घेते ), आत्ता म्हणतीस हो आणि नंतर त्याच काही करणार नाहीस (मनातून थोड मान्य; पण उत्तर होत ' तू मला आणूच नाही दिलस कधी तर कळणार तरी कस मी काही करते का नाही ते !') अश्या सगळ्या माहोलात बाबा मनापासून माझ्या बाजूने होते हे मला माहिती होत आणि दादा घरी नव्हता त्यामुळ आई एकटी पडलेली. शिवाय आपली पोरगी बक्षीस म्हणून मागतीय तर देऊया अस वाटल बहुतेक माझ्या माउलीला :)
आणि finally मला ते तीन  गोड शब्द ऐकायला मिळाले : आई म्हणाली ' बर बाई । आण !' हिंदी serial ची डिरेक्टर असते तर या dilogue ला मी तीनदा repeat केल असत !
दुपारी बाबांनी हळूच सुचवलं, "आजच आणूया जमल तर ! ?" विचार पटला मला आणि आम्ही दोघ बाहेर पडलोही. थोडी शोध मोहीम आधीपासूनच सुरु ठेवल्यामुळ संध्याकाळी मी बाबा आणि आमच नवीन लाब्राडोर पिल्लू घरी पोचलो !
इतका गोंडस जीव. छोटुस बाळ माझ . पिल्लू घराबाहेर ठेवायचं हा नियम बरोबर नाही हे मी घरी पोचायच्या आधीच ठरवलं. मग गच्चीवर ठेऊया रात्री यासाठीही  माझ मन तयार होईना. तिची आईपासून लांब अशी पहिलीच वेळ असणार. घाबरून जाईल न ती. मग तिला आईची आठवण येणार नाही अशी आमच्या घरात फक्त एकच जागा होती - माझी खोली !
ती माझ्या बरोबर कॉटवर  झोपणार नाही यावर आई आणि बाबा पण ठाम होते. पण मी खाली गादी घातली आणि गादीच्या शेजारी ती झोपली तर !?  ;) तेव्हापासून कायमच माझ्या खोलीत माझ्या गादीशेजारी किंवा माझ्या बेडखाली तिला ध्रुव ताऱ्यासारख अढळ स्थान होत. तिच्या या जागेमुळ सकाळी उठलं कि तिच्या अंदाजान फूटभर पुढ पाउल ठेवायची सवय लागलेली मलाही. पुढ job साठी मुंबईला गेल्यावर गुणी नव्हती बरोबर पण सवय मात्र नव्हती गेली !


Picture credit : Anu tai (Anujna Dnyaneshwar)
एक दोन दिवस झाले तरी माझ तिच्या नावाबद्दल काही ठरत नव्हत .. finally बाबांनी नाव ठेवलं … गुणी…
मी शाळेत असताना आमच्याकड German shepherd  होती आणि तीच नाव होत गुणी … म्हणून  बहुतेक दुसर कुठल नाव आवडतच नव्हत आम्हाला. ठरलं final … गुणी !!

गुणू खूप हुशार होती. तिला दोन तीन दिवसातच नाव कळलेलं स्वतःच. त्यानंतरचा आठवडा 'गुणी' म्हटलं कि ती कशी आपल्याकड बघती याच प्रात्यक्षिक करण्यात आणि दाखवण्यात गेला आमचा.  "गुणी खरच किती गुणी आहे !!" हा एक stapled dilogue झाला पुढ आमच्या घरी. आम्ही बहुतेक तिला 'shake hand' वगैरे गोष्टी शिकवायला विसरलो तेव्हा. गुणीच शिक्षण शुद्ध मराठी माध्यमातून झालं ! आम्ही सगळेच (बाबा थोड जास्तीच! ) तिच्याशी ती एक मूक पाळीव प्राणी आहे हे विसरून बोलत राहायचो. बाबांच्या 'चष्मा कुठ सापडेना गुणे, बघितलायस का ?'  इथून पासून माझ्या 'गुणू, power electronics सुटेल ना ग ?' पर्येंत सगळ्या प्रश्नांना गुणी सामर्थ्यान सामोरी गेली. या सगळ्या गप्पांमुळ असेल पण गुणा खूप गोष्टी शिकली.  भाषा समृद्ध होती तिची ! command कमी शिकली (आम्ही कमी शिकवल्या !) पण आख्खी वाक्य समजायची तिला मस्त.

दात शिवशिवतात त्या phase मध्ये गुणी फक्त कार्यानुभवाचा तास चालू ठेवायची घरी. कागदाचे किती छोटे छोटे तुकडे केले जाऊ शकतात, कचरा वेळेत घराबाहेर नेला नाही तर घरभर कसा पसरला जाऊ शकतो, बूट किती चावला कि त्यातून आरपार दिसायला लागत हे सगळ करून बघितलं तिन. आम्ही कुणी चिडून 'कुणी केल हे सगळ ?' म्हटलं  कि मात्र चेहरा पाडून maximum  बिच्चारे expressions देत खाली बघत बसायची. विषय बदलेपार्येंत वरसुद्धा नाही बघणार मग तेव्हा.

थोडी मोठ्ठी झाल्यावर ती गाडीवर बसायला शिकली आणि प्रचंड आवडायचं तिला गाडीवरून फेरी मारायला. हुशार तर एवढी कि कधी घेऊन जाऊ शकतात आणि कधी नाही हे पण पक्क माहिती होत तिला. आईच्या आणि माझ्या कॉलेजला जायच्या वेळेत अजिबात हट्ट नाही करणार. पण अश्या ठराविक वेळा सोडल्या तर घरातलं कुणीही बाहेर निघाल आणि हातात गाडीची किल्ली दिसली कि तीच त्या माणसावरच प्रेम उतू जायचं . घेऊन नाही गेल तर परत येईपर्यंत आपल्यालाच guilty वाटत राहील ! पण बसायची मस्त गाडीवर. पायातल्या जागेत अलगद पण निवांत बसून फक्त  तोंड बाहेर  काढून heroine सगळीकड निरखत बसायची. कधी कधी तर वाटायचं आपण driver आहोत हिचे. truck किंवा मोठ्ठी गाडी आली शेजारून कि मात्र लगेच मन लगेच आत घ्यायची. घाबरट ! कधी कधी मग पळायचा मूड यायचा तिला. जास्ती स्पीडमध्ये कधीच नाही उडी मारायची खाली, speed breaker ला गाडी हळू झाली कि टुन्नकन उडी मारेल आणि मग पळत येईल बरोबर.


पाहुणे आले कुणी आणि जर घाबरत असतील कुत्र्याला तर मग तिला गच्चीवर पाठवाव लागायचा.  आधी माझ्या खोलीत जाण्याचा option ट्राय करायची, नाहीच म्हटलं तर मग जायची वर finally. पण मग अश्या वेळी बाहेरचं माणूस जाण्याकड खूप लक्ष असायचं तिच. ते गेले कि हिच मागच्या दाराला दंगा सुरूच "आत घ्या मला ..  गेले ते !" लहान मुलांबद्दल मात्र थोड उलट. ती कधीच कुणा लहान मुलावर गुरगुरली नाही , परिणामी सगळ्या टिल्यांना पण चांगल खेळण वाटायची ती. मग तिची शेपूट ओढ , तिचा घोडा बनव असल सगळ सुरु व्हायला वेळ लागायचा नाही. तीच ती पण ओळखून होती बहुतेक. कुणीही लहान मुल घरी आल, कि गुणी आपोआप मागच्या दाराजवळ जाऊन उभी रहायची ! दार उघडल कि धुम्म पळून जायची गच्चीवर.

सगळ्यांच्या गप्पा ऐकण्यात प्रचंड इंटरेस्ट होता तिला. प्रत्येक खोलीत आपली आपली जागा बनवून ठेवलेली तिन. बाबा कधीही म्हणाले गुणे, जागेवर जा तुझ्या  कि हि त्याच खोलीतल्या तिच्या स्वघोषित जागेवर जायची! त्यापुढ जर म्हणाल" इथ नाही. तुझ्या खऱ्या जागेला" तरच मग दाराजवळ जाऊन बसेल.

लहानपणीचे दिवस सोडले तर खूप कमी संहारक कृत्य केली गुणून … :) गाडीवर किंवा hall मधल्या गालिच्यावर पाय द्यायचा नाही हे पण madam ओळखून होत्या. गालिच्याची जागा बदलली आणि तिला यायला जागा राहिली नाही कि घुटमळत रहायची. थोडी जागा करून दिली कि त्यातून वाट काढून येणार. एकदम नजकातसे !

बाबा तिच्या ट्रेनिंग बद्दल आणि तिच्या गुणीपणावर खूप खुश असायचे कायमच. अपवाद एकच… तिचे 'ते' दिवस … मग तेव्हा आमची heroine चोरून पळून जायची तिच्या प्रियकरांबरोबर ! मग बाबांची फुल चिडचिड. तिच्यावर आणि आमच्यावर पण ! परत यायच्या बाईसाहेब तेव्हा बाबा तिची शाळा घ्यायचे. " अस जातात का पळून. लाज आहे का जीवाला तुझ्या. मी देतो कि तूला बघून चांगला" वगैरे सुरु व्हायच बाबांचं. गैरसमज नकोत म्हणून एक दोनदा मी बाहेर जाऊन बसलेलं आठवत मला ! :)

बाकी दादा आणि आईचा कुत्र घरी आणायला मुळचा विरोध असला तरी, गुणीची जास्ती काळजी त्यांनीच घेतली. तिच्या पाण्याच्या कुंड्यात कायम पाणी पाहिजे असा दादाचा सक्त आदेश होता. तिला फिरवायला घेऊन जाण्यातहि दादाच जास्ती वक्तशीर होता.  आमच्या एका स्वयंपाकाच्या काकूंच्या पोळ्यांवर  गुणीन जाहीर बहिष्कार टाकलेला. वास्तविक चांगल्या पोळ्या करायच्या त्या पण गुणीला नाहीच आवडल्या त्या. त्यांच्या पोळीत थोडा जरी काळा तुकडा दिसला तर बाहेर काढून ठेवायची गुणी तिच्या कुंड्यातून ! त्यांनी वैतागून काम सोडण पुरेस त्रासदायक झाल होत माझ्या आईसाठी!

कुणी काही खात असेल तर त्याच्या घासाकड बघायचं नाही हे एक बाबांनी तिला दिलेलं खास training. चुकून बघत बसलीच तर बाबा फक्त म्हणणार "कुठ बघायचं ?" madam लगेच खाली मान घालतील किंवा दुसरीकडेच कुठतरी बघतील.


म्हातारी झाली तशी तब्ब्येतीला जपून राहायला लागली गुणा. थंडीच्या दिवसात अंथरूण घालून दे वाले expressions द्यायची आणि अंगावर घातलेली तिची छोटू गोधडी सकाळी उठेपर्येंत नीट जपायची!

प्रत्येक किस्सा सांगण्याजोगा आहे तिचा. किती सांगू !

पुढ जेव्हा खूप आजारी पडली आणि डॉक्टरनी सांगितलं ,नाही काही इलाज आता याला तेव्हाही मी भारतात जाईपर्येंत तग धरलेला तिन.

गुणी नाहीये आता आपल्यात. गच्चीच्या छोट्याश्या खिडकीतून आमची वाट बघत बसणारी गुणी  आमच्यातल कुणी घरी येताना दिसलं कि फुल स्पीडनी गच्चीवरून खाली पळत नाही येणार आता ,आल  कि उडी मारणार नाही अंगावर, किती miss करीन मी तिला यापुढ कायमच. मागच्या वर्षी २४ डिसेंबरला गुणू गेली आम्हाला सोडून. तेव्हापासून ठरवत होते तिच्याबद्दल लिहायचं. हा त्यातलाच एक प्रयत्न !